Thursday, November 28, 2013




दु:ख, आघात, अपेक्षाभंग या म्हणाव्या तितक्या नकारात्मक गोष्टी नाहीयेत.... जितकी गरज तीव्र सुख अनुभवण्याची असते तितकीच गरज तीव्र दु:ख अनुभवण्याची आणि ते पचवून त्यातून सही सलामत बाहेर पडण्याची असते... अशा घटना आपल्याला आधीपेक्षा जास्त शहाणे करतात आणि एक नवीनच झळाळी आणतात!!
 

- रसिका

Wednesday, November 20, 2013

Dedicated to my near and dear ones...... :)



तू आहेस म्हणून माझ जगणं सुंदर, सुसह्य आहे... एरवी इतक्या मोठ्या जगात आपले काही थोड्याच लोकांशी जमते... प्रचंड आवडणारी अशी काही मोजकीच जिव्हाळ्याची लोकं आपल्यासोबत असतात.. त्यात तू मला भेटावस, लाभावस हे माझे केवढे भाग्य! या पेव्हर्स ब्लॉक्स सारखेच आपले बंध घट्ट एकमेकांत गुंतलेले आहेत... काही नाती आपोआप जन्मत: मिळतात.. काही स्वप्रयत्नाने तर काही निव्वळ योगायोगाने... पण तरीही कुठल्याही नात्याचे महत्व तसूभरही कमी होत नाही! माझया लहानसहान आनंदातला, सुख दु:खातला सोबती, कधी माझे नुसते ऐकून घेणारा तरी कधी मला चार गोष्टी ऐकवणारा... काही भेदरलेल्या, प्रचंड खचलेल्या क्षणी पाठीशी उभा राहीलेला तू... तर कधी नुसती पाठीवर थाप टाकून प्रेमाचा प्रचंड वर्षाव करणारा तू... मला हवा आहेस आयुष्यभर!!



Sunday, August 11, 2013

लग्न लग्न.......

प्रेम प्रेम .. उत्कट उत्कट..
लग्न लग्न.. अरेंज अरेंज..
पत्रिका हो.. चस्मा नाही.. मंगळ हो...
फोन फोन.. '' मुलगी गोरी? ''
'' फोटो लावलाय! ( पाहून तुम्हीच ठरवा! )'' - आई
तरी पलीकडून ''नक्की गोरी?''
''हो!'' - आई
राग राग.. नंतर हसू हसू
लग्न लग्न.. अपेक्षा अपेक्षा
हाइली क्वालिफाइड.. IT / CA /CS  इत्यादी
शिवाय कल्चर्ड,  Sociable !
मुलगा मुलगा... अनुरूप अनुरूप..
पण नेमका कसा?
लेखक, पत्रकार, लेक्चरर की फक्त IT IT?
प्रेमळ.. संवेदनशील.. वाचनप्रिय.. वेगळा विचार करणारा!!
गोंधळ गोंधळ.. .
दादर .. ठाणे.. अंबरनाथ.. डोंबिवली
बजबजपुरी सारी...
लग्न- चान्स बाहेर पडण्याचा
नाशिक, रत्नागिरी, सांगली, पुणे..
पण मुंबईतले रोपटे रुजेल तिथे?
लग्न लग्न
कठीण कठीण!!! :) :)

- रसिका

Thursday, February 21, 2013

खैरमाळचा अनुभव

( आयुष्य किती साधं असु शकत आणि आपले काही बांधव असं साधं, मुक्त आयुष्य जगत असताना आपण मात्र असंख्य गराजांमधे स्वत:ला किती कोंडून घेतलय याची जाणीव करून देणारा अनुभव... त्याच बरोबर आपल्या आणि त्यांच्या आयुष्यातल्या विरोधाभासाची जाणीव करून देणारा आणि पुन्हा एकदा नक्की जगायच तरी कस? Materialistic गोष्टींना किती महत्व द्याव? की द्यावं सारं झुगारून?? असे अनेक प्रश्न मनात उत्पन्न करणारा अनुभव! :) )
   'वयम' चळवळीचे काम पाहण्यासाठी आणि स्थानिक आदिवासींचे जीवन जवळून पाहण्यासाठी जव्हार ला जायचे बेत कधीपासून आखत होते... शेवटी ११-१२ फेब्रुवारीला जायचा योग आला. डोंबिवलीहून सकाळी ९.३० वाजता मी आणि गायत्री निघालो. डोंबिवली-कल्याण, कल्याण-भिवंडी, भिवंडी-जव्हार असे टप्पे पार करत करत दुपारी ३.४५ ला जव्हार बस स्थानकात पोहोचलो. जवळच्या एका जुन्या लाकडी बांधणीच्या उपाहारगृहात मिसळीवर ताव मारला आणि मग मिलिंद दादाच्या घरी मोर्चा वळवला!
    चहा पिता पिता थोडा वेळ दीपाली ताई, सई आणि दादाशी गप्पा झाल्या आणि मग कोगद्याला जायला घरातून बाहेर पडलो. जव्हार कोगदा असा सुमारे ४० मिनिटांचा जीप प्रवास केल्यावर खैरमाळला जाण्यासाठी डोंगर उतरू लागलो. सव्वा सहा वाजले असावेत. सतत निसरडी वाट उतरत होतो आम्ही. खूप दिवसांनी डोंगराळ भागात आल्यामुळे माझ्या शहरी मनाला डोंगर उतरायचा थोडा कंटाळाच आला होता. मधल्या मधल्या पठारावरून दोन्ही बाजूंना दिसणारा देखावा मात्र खिळवून ठेवणारा होता. निळसर करड्या रंगाची झाक असलेले डोंगर खूप सुंदर दिसत होते. कॅमेरा न आणल्याचा थोडा पश्चात्ताप होत होता. मात्र आदिवासी पाड्यात मला एक फोटोग्राफर म्हणून जायचे नव्हते. तिथल्या लोकांशी छान गप्पा मारायच्या होत्या... एक दिवस त्यांच्याबरोबर त्यांच्यातली होऊन राहायचे होते. कॅमेरा नेला असता तर उगाच तिथल्या मुलांचे, लोकांचे, घरांचे फोटो काढण्याच्या नादात वेळ गेला असता आणि त्या लोकांना कॅमेरयामुळे संकोच वाटला असता तो वेगळाच!
   सतत उतरंड उतरत असताना, जंगलातून जात असताना, एकीकडे मनात प्रश्नांची मालिका चालू होत होती... ''बापरे! अर्ध्या पाऊण तासापासून डोंगर उतरतोय आपण! किती आत, दरीत आहे हे गाव!!'' वाटेत एक लहानसा पाणीसाठा लागला. रामदासने सांगीतले गावातल्या बायका इथूनच पाणी भरतात.. उथळ डबके होते ते कातळातले.. दोन अडीच फूट लांबीचे.. खालून पाण्याचा जिवंत झरा असल्याने पाणी साठून राहत नाही आणि म्हणूनच पिण्यायोग्य आहे. छोटी लोटी यात बुडवून पाणी भरायचे... इथून थोडे वर गेल्यावर लहान मुलांचा आवाज यायला लागला.. चला गाव जवळ आले होते तर! खैरमाळ इन मीन ८/९ घरांचा पाडा आहे. रामदास सांगत होता, त्याचे आजोबा सगळ्यात आधी इथे येऊन स्थायिक झाले.. आता कुटुंब वाढल्याने ८/९ घरे झाल्येत. 
   आम्ही रामदासच्या भावाच्या घरी उतरलो. सारवलेले, स्वच्छ आंगण.. आंगणात चिंचेच्या झाडाखाली एक लाकडी पलंग ठेवला होता... विटांच्या भिंती असलेले कौलारू घरही छान शेणामातीने सारवलेले होते. आम्ही बाहेरच आंगणात गप्पा मारत बसलो. गावात वीज नाहीये. बाजूच्या घराच्या कौलांवर सोलार पॅनेल लावलाय. त्या विजेवर २/३ बल्ब लागतात तेवढेच. बाकी घरात वगैरे वीज नाहीच. एक टाटा इंडिकॉमचा फोन त्या आंगणात होता. दादा म्हणाला, हा इथला कॉमन फोन आहे. फोन वाजला की जवळपासच कोणीही उचलत... मला गंमत वाटली. :) 
   गावात एकही दवाखाना नाही. त्यामुळे आजारी माणसाला झोळीतून दरड चढून एकतर कोगद्याला किंवा दुसर्‍या बाजूने आहिरे गावात ( सुमारे ३.५ किमी ) न्यावे लागते. प्रत्येक बाईला किमान ३/४ मुले आहेत... पाड्यात दवाखानाच नसल्याने बाळंतपण घरातच होत असणार... गावातली मुले बाजूच्या गेटपाड्यातल्या ( सुमारे १.५ किमी ) प्राथमिक शाळेत जातात. त्यापुढे शिकायचे झाल्यास अजुन पुढे २ किमी वरच्या आहिरे गावात जायला लागते. गावातले लोक मजुरीच्या कामावर जातात आणि हंगामात शेती करतात. भात, उडीद, नाचणी अशी पिके होतात. घरात शेळ्या, कोंबड्या, गाय-बैल असे पाळीव प्राणी आहेत. भात, नाचणीची भाकरी, भाजी आणि काही खास प्रसंगी कोंबडी/ शेळीचे मटण असा लोकांचा आहार आहे.
   आम्ही गेलो तेव्हा गावातल्या बर्‍याच लोकांनी मजुरीसाठी स्थलांतर केले होते. घरात वृद्ध माणसं आणि लहान मुलं तेवढी होती. आमच्या अवतीभोवती पाड्यातली १५/१६ लहान मुले जमली होती... कुतुहलाने आमच्याकडे पाहात होती... दबक्या आवाजात एकमेकांशी बोलत होती... आमच्याशी गप्पा मारायला मात्र लाजत होती.. :) जमलेल्या आदीवासींशी दादा रोजगार हमी योजानेबद्दल, मोबदला वेळेवर मिळाला नाही तर करायच्या तक्रार अर्जाविषयी वगैरे चर्चा करत होता. लोकं शांतपणे ऐकत होती. ८.३० च्या सुमारास आम्ही सुट्टी केली (मीटिंग संपवली). पोटात कावळ्यांनी केव्हाच काव काव सुरू केले होते... जेवणाचा निरोप घेऊन रामदास आला तेव्हा हायसे वाटले! :) 
   रामदासनी एक पातेल हात धुण्यासाठी पुढे केलं... आधी अशा रॉयल ट्रीटमेंट साठी आम्हाला संकोच वाटला.. मात्र ते पाणी रियूज केले जाते असे कळ्ल्यावर आम्ही निमूट त्यात हात धुतले. ताट भरून भात, पात्तळ आमटी, फ्लॉवर बटाटा भाजी आणि कांदा असा फक्कड बेत होता. जेवण झाल्यावर पुन्हा आंगणात गप्पा रंगल्या... आकाशात तारे, नक्षत्रे आपापले अस्तित्व दाखवत मस्त लूकलुकत होती.. १०.३० वाजता ओसरीवर पथारी टाकून निजलो. निरव शांतता... आंगणातल्या दिव्या व्यतिरिक्त कुठलाच प्रकाश नाही. एक वेगळेच शांत वातावरण खूप दिवासांनी अनुभवायला मिळत होते.
   सकाळी तोंड वगैरे धुवून ताईंशी रामदासाच्या वहिनीशी स्वयंपाकघरात गप्पा मारत बसलो. शेणानी छान सारवलेले स्वयंपाकघर चुलितल्या जळणामुळे मस्त उबदार झाले होते...घरातल्या मांजरीची पिल्ले उबेसाठी कोपर्‍यात पहुडली होती. ताईंनी चुलीवर एका बाजूला चहा ठेवला होता आणि एकीकडे भाक-यांचा तवा टाकला होता. गावची आरोग्यसेवीका म्हणून ताईंनी काम केले होते. वर जव्हारला जाऊन औषधे, लसी घेऊन यायच्या, गावातल्या लहान मुलांना पोलिओ डोस द्यायचे असे कामाचे स्वरुप होते. "इतक्या दुर्गम भागात नर्स यायला तयार होत नाहीत त्यामुळे निरक्षर असूनही माझ्यावर काम सोपवले गेले".... "लहानपणी गुर चारायला जावे लागे त्यामुळे शाळेत जाऊ शकले नाही"..... ताई सांगत होत्या.... ताईंनी कौतुकानी आम्हाला चहाबरोबर त्यांच्या लहानशा दुकानातले टोस्ट खाऊ घातले. जाताना नागलीच्या भाकरीची चव चाखुन ताईंचा आणि खैरमाळचा निरोप घेऊन बाहेर पडलो...
 ०  सकाळी ५/६ महिने गर्भवती असलेल्या महीलेला देखील पाण्यासाठी टेकडी उतरताना पाहीले होते.. मनात आले आपल्याकडे अशा भावी मातांची आपण किती काळजी घेतो नाहीतर इथे... पण इथे गावात कुठेच विहीर नाही.. (विहिरीला पाणी लागत नाही) त्यामुळे पाण्यासाठी टेकडीची चढउतार अपरिहार्य आहे.
०  खैरमाळ सारख्या ५०/६० लोकवस्तीच्या जंगल पाड्यात दवाखाना कुठून असणार? पण काहीतरी मार्ग काढून गावात आरोग्य सेवा पोहोचायला हवी... ही सगळी आपल्यासारखीच २१ व्या शतकातली माणसे आहेत आणि आज जरी कमी असली तरी काही वर्षानी इथली लोकसंख्या वाढणारच आहे. मुंबईतल्या अनाधिकृत झोपड्या दर १०/१५ वर्षानी अधिकृत होतात. त्या लोकांना वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य अशा सर्व सोयी उपलब्ध होतात. शासानाबरोबरच कित्येक स्वयंसेवी संस्था अशा झोपडपट्टीत आरोग्य, शिक्षण देण्यासाठी झटत असतात. मग खैरमाळ सारख्या पाड्यातले लोक तर वर्षानुवर्षे दशकानूदशके तिथे वास्तव्य करून आहेत. तरीही दुर्गम भौगोलीक परिस्थिती आणि छोटा समुह यामुळे शासनदरबारी यांना स्थान नाही. 
   आपल्याला शहरात मूलभूत सोयींबरोबरच विवीध मनोरंजनाची साधने, उच्च शिक्षणाच्या अनेक सोयी, बाजारपेठा, रोजगाराचे असंख्य पर्याय उपलब्ध असतात. पण इतके सगळे असूनही आपण आतून कुठेतरी अस्वस्थ असतो. नाखूश असतो आपल्या जगण्यावर. आपल्याला सतत काहीतरी नवीन करायचे असते, शिकायचे असते, अपग्रेड व्हायचे असते. नवीन जागा, घर, नोकरी, लोनचे इएमआइ, मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक गैजेट अशी टार्गेट्स डोळ्यासमोर ठेऊन जगत असतो. आयुष्याकडून आपल्या प्रचंड अपेक्षा असतात. त्या पूर्ण करायच्या नादात, सततच्या स्पर्धेच्या वतावरणात लहान सहान गोष्टीतला आनंद घ्यायलाच आपण विसरतो. जास्त पैसे खर्च करून सुख विकत घेता येते असा काहीसा आपण स्वता:चा समज करून घेतो. आपल्या वैयक्तिक आयुष्यातील प्रगतीपुढे सामाजीक आयुष्यातील प्रश्नांकडे, इतर समाजघटकांच्या सुख दु:खाकडे लक्ष्य द्यायला आपल्याला फुरसतच नसते. स्वता:च्या आयुष्याभोवतीच आपण पिंगा घालत असतो!
   खैरमाळला आल्यावर जाणवले, आपल्याला शहरात उपलब्ध असणार्‍या असंख्य सोयी इथे नाहीत. पण तरीही इथल्या जगण्यात एकप्रकारचे समाधान आहे, सुकून आहे. लोकांच्या गरजाच मुळात मर्यादित आहेत त्यामुळे त्या पूर्ण करताना त्यांची दमछाक होत नाही. मुलांकडे एकत्र जमून खेळायला भरपूर मोकळी जागा आहे.. खायला रानमेवा आहे... मुले मोठ्यांना पाणी भरण्याच्या आणि शेतीच्या कामात मदत करतात त्यामुळे आपल्याकडे क्वचित दिसणारे संपूर्ण घरातले Bonding  इथे आहे. इथले लोक निसर्गाच्या सोबतीने त्याच्या शीतल छत्राखाली जगतात त्यामुळेच कदाचित इथल्या कष्टकरी लोकांच्या सावळ्या चेह-यावर समाधानाचे तेज दिसते. पाणी, आरोग्य, वीज यांसारख्या मुलभूत सोयी आणि पशुपालन, शेतीतले तंत्रज्ञान, उपयुक्त वनस्पती लागवडीचे आणि बाजारपेठेचे ज्ञान यासारखे व्यावहारीक शिक्षण इथे पोहोचले तर तारप्याच्या तालावर थिरकणारे इथले साधे जीवन अधिक सुकर आणि समृद्ध होईल यात शंका नाही.

- रसिका जोशी

Friday, January 25, 2013

मुंबई सारखी शहरे आता खूप मोठा गुंता होऊन बसल्येत..... सगळ्यांनाच फक्त पैसा कमावणे हेच जगण्याचे इतिकर्म वाटू लागलय... म्हणजे पैसा कमावण आवश्यक आहेच; पण अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण अश्या प्राथमिक गरजांबरोबर AC, Car, मोठी घरे, अधिक आरामदायी जीवनशैली, नवनवीन सौंदर्य प्रसाधने, Mall मधले Shopping, Hoteling, Electronic Gadgets, महागडे उच्च शिक्षण या सगळ्या नव्या खर्चांनी शहरातले जगणे व्यापून टाकलय.... अशा वाढीव गरजा भागवण्यासाठी अजुन पैसा... आणि तो मिळवण्यासाठी सगळ्यांनीच मुंबईकडे धाव घेण......
वहिवटा सोडून नवे मार्ग शोधण्याची हिंमत आमच्या पिढीत यायला हवी...........

- रसिका जोशी

Saturday, January 12, 2013

आधुनिक कपड्यांमधला मागास भारत!!!


२७ डिसेंबर २०१२

आपले कपडे, राहणीमान, घरे, कार्यालये, मनोरंजन सगळे काही चकचकीत दिखाऊपणाकडे झुकलेले असताना मन आणि संवेदना बोथट होत चाल्येत..... जाहिरातिंसारख्या माध्यमातून मुलीच्या आखया शरीराचाच लिलाव केल्यासारखा वाटतो!!!! काही प्रॉडक्ट्स च्या जाहिराती अगदी वर्तमान पत्रातील देखील माझया चिमुकल्या भाच्यांनी चुकुन पहिली तर त्याना काय वाटेल? किंवा सहावी सातवीतल्या आडनीड्या वयातील मुलानी पाहिल्या तर ते काय विचार करतील असा प्रश्न पडतो... आपण पैसा, दिखऊपणा, शारीरिक सौंदर्य, सेक्स, या सर्वाना अवास्तव महत्व देत नाहियोत का? जागतिक महासत्ता बनायची स्वप्ने पाहत असताना मनं किती संकुचित होतायत आपली??? मुलीला पूर्वी जसे केवळ शोभेची वस्तू म्हणून वापरले गेले तसेच आपण परत करत नाहियोत काय???

दिल्ली रेप केस बद्दल परवा ट्रेन मधल्या बायकांची चर्चा ऐकून मन व्यथित झाले... त्या नीच कृत्याला त्या बायका ''जानावरासारखे वागणे'' असे म्हणत होत्या!!

आपले राहणीमान जसे दिखाव्याकडे झुकत चालले आहे तसे आपल्या संवेदनाही मरत चालल्या आहेत.... गरजू व्यक्तीला मदत करण्यासाठी शारीरिक बळाची नव्हे मानसिक कणखरपाणाची गरज आहे!!! आणि माणसांच्या चुकीच्या कृत्याला पशुची उपमा देणे आधी थांबवले पाहिजे... थोडासा अभ्यास केले तर कळेल की निसर्गात एखाद्या मादीला जिंकण्यासाठी नर काय काय कष्ट घेतो... अगदी छोट्या फुलपाखरपासून ते मोरापर्यंत अनेक प्राणी पक्ष्यांमधे नर मादीला जिंकण्यासाठी कष्ट घेतो... कधी तिच्यासाठी सुंदर नृत्य करून, तर कधी तिच्यासाठी घरटे बांधून ... आणि अगदी फुलपाखरांमधे देखील जोडीदार निवडीचा अधिकार मादीला असतो.... एखाद्या मादीला एखादा नर मेटिंग साठी अयोग्य वाटला तर ती तसे संकेत देते आणि तो नर तिच्या निर्णयाचा आदर करून निघून जातो!!! असे असताना प्रगत आणि हुशार माणूस जातीच्या बलात्कारासारख्या विकृत कृत्याला आणि त्या व्यक्तीला जनावराची उपमा देणे अजिबात योग्य नाही!! हा समस्त पशु जातींचा अपमान होईल. माणसासारखा वाईट माणूसच!!


- रसिका जोशी

पुरुषी माज आणि आणि संवेदनाहीन बघे

२७ फेब्रुवारी २०१२ जुहू. (मुंबई)

आज जूहुला एका बाईला भर रस्त्यात एक माणूस (तिचा नवरा? ) चप्पलेनी मारत होता... आजूबाजूला सगळीकडे रीक्षेवले, स्टॉलवाले आणि इतर लोकांची वर्दळ होती... आणि त्यातले 98 % पुरूष होते !!! मी तिथे एका फोटोग्राफर मित्राची वाट बघत उभी होते... मी त्या माणसाला तिला दोनदा चपपलेनी तोंडावर मारताना पाहिलं... ती बिचारी केविलवाणी होऊन दोन्ही हात तोँडासमोर धरून नुसतीच त्याच्याकडे बघत होती... तिच्या बाजूला तीचीच मैत्रीण थंडपणे बसलेली!! आणि आसपासची लोक नुसता तमाशा पाहत होते... एका पॉइण्ट ला मला ते द्रुश्य सहनच झाल नाही.. मी त्या नालायक माणसाजवळ जाउन ओरडले.. " मारो मत पुलिस को बुलाउन्गि !!!! " मग तो जरा मागे हटला... मी अजुन त्याला चार शब्दा सुनावल्यावर त्याने तिला मारण थांबवल आणि तिथून गेला.... माझया मधे येण्यानी त्या बाईची त्याच्या तावडीतून सुटका झाल्ये असं वाटत असतानाच तो माणूस चक्क काठी घेऊन तिला मारायला आला!!! तरीदेखील आजबाजूच्या लोकांच्या प्रतिक्रियेत काहीही फरक पडला नाही... मी पुन्हा नुसती तिच्यासमोर जाऊन उभी राहिल्यावर तो माणूस वाटेतच काठी टाकून निघून गेला !!!
मी जेव्हा ही घटना घरी सांगीतली तेव्हा आईची प्रतिक्रिया अशी होती...
'' त्यानी तुला काही केले असते तर?? आपण फार मधे पडू नये.." मी त्यांची काळजी समजू शकते पण समजा उद्या मलाच कोणी रस्त्यात इजा पोचवयचा प्रयत्न केला असता आणि आजूबाजूच्या शेकडो लोकांपैकी एकानेही मदत केली नसती तर???? :( :( त्या बाईला मारत असतानचे द्रुश्य पाहून मी थरथरत होते... पण अचानक कुठुनतरी बळ आल आणि मी मधे पडले... आपण निदान आपल्या डोळ्यांसमोर होणारा अन्याय तरी थांबवायचा प्रयत्न केला पाहिजे अस मला वाटत... आपल्या छोट्याशा कृतीनेदेखील एखाद्याला खूप फायदा होऊ शकतो!! फक्त आपल्या संवेदना जागृत ठेवायला हव्यात... दुसर्‍याचा बचाव करण्यासाठी थोडस धैर्य दाखवायला काय हरकत आहे? भलेही त्या माणसाने मी गेल्यावर तिला पुन्हा मारल असेल.. पण चार चौघात मारताना मी त्याला आडवल्याचा परिणाम एका तरी ''बघ्यावर'' झाला तर पुढच्यावेळी तो देखील कदाचित कोणालतरी मदत करेल... तुम्हाला काय वाटत?


- रसिका जोशी