Thursday, February 21, 2013

खैरमाळचा अनुभव

( आयुष्य किती साधं असु शकत आणि आपले काही बांधव असं साधं, मुक्त आयुष्य जगत असताना आपण मात्र असंख्य गराजांमधे स्वत:ला किती कोंडून घेतलय याची जाणीव करून देणारा अनुभव... त्याच बरोबर आपल्या आणि त्यांच्या आयुष्यातल्या विरोधाभासाची जाणीव करून देणारा आणि पुन्हा एकदा नक्की जगायच तरी कस? Materialistic गोष्टींना किती महत्व द्याव? की द्यावं सारं झुगारून?? असे अनेक प्रश्न मनात उत्पन्न करणारा अनुभव! :) )
   'वयम' चळवळीचे काम पाहण्यासाठी आणि स्थानिक आदिवासींचे जीवन जवळून पाहण्यासाठी जव्हार ला जायचे बेत कधीपासून आखत होते... शेवटी ११-१२ फेब्रुवारीला जायचा योग आला. डोंबिवलीहून सकाळी ९.३० वाजता मी आणि गायत्री निघालो. डोंबिवली-कल्याण, कल्याण-भिवंडी, भिवंडी-जव्हार असे टप्पे पार करत करत दुपारी ३.४५ ला जव्हार बस स्थानकात पोहोचलो. जवळच्या एका जुन्या लाकडी बांधणीच्या उपाहारगृहात मिसळीवर ताव मारला आणि मग मिलिंद दादाच्या घरी मोर्चा वळवला!
    चहा पिता पिता थोडा वेळ दीपाली ताई, सई आणि दादाशी गप्पा झाल्या आणि मग कोगद्याला जायला घरातून बाहेर पडलो. जव्हार कोगदा असा सुमारे ४० मिनिटांचा जीप प्रवास केल्यावर खैरमाळला जाण्यासाठी डोंगर उतरू लागलो. सव्वा सहा वाजले असावेत. सतत निसरडी वाट उतरत होतो आम्ही. खूप दिवसांनी डोंगराळ भागात आल्यामुळे माझ्या शहरी मनाला डोंगर उतरायचा थोडा कंटाळाच आला होता. मधल्या मधल्या पठारावरून दोन्ही बाजूंना दिसणारा देखावा मात्र खिळवून ठेवणारा होता. निळसर करड्या रंगाची झाक असलेले डोंगर खूप सुंदर दिसत होते. कॅमेरा न आणल्याचा थोडा पश्चात्ताप होत होता. मात्र आदिवासी पाड्यात मला एक फोटोग्राफर म्हणून जायचे नव्हते. तिथल्या लोकांशी छान गप्पा मारायच्या होत्या... एक दिवस त्यांच्याबरोबर त्यांच्यातली होऊन राहायचे होते. कॅमेरा नेला असता तर उगाच तिथल्या मुलांचे, लोकांचे, घरांचे फोटो काढण्याच्या नादात वेळ गेला असता आणि त्या लोकांना कॅमेरयामुळे संकोच वाटला असता तो वेगळाच!
   सतत उतरंड उतरत असताना, जंगलातून जात असताना, एकीकडे मनात प्रश्नांची मालिका चालू होत होती... ''बापरे! अर्ध्या पाऊण तासापासून डोंगर उतरतोय आपण! किती आत, दरीत आहे हे गाव!!'' वाटेत एक लहानसा पाणीसाठा लागला. रामदासने सांगीतले गावातल्या बायका इथूनच पाणी भरतात.. उथळ डबके होते ते कातळातले.. दोन अडीच फूट लांबीचे.. खालून पाण्याचा जिवंत झरा असल्याने पाणी साठून राहत नाही आणि म्हणूनच पिण्यायोग्य आहे. छोटी लोटी यात बुडवून पाणी भरायचे... इथून थोडे वर गेल्यावर लहान मुलांचा आवाज यायला लागला.. चला गाव जवळ आले होते तर! खैरमाळ इन मीन ८/९ घरांचा पाडा आहे. रामदास सांगत होता, त्याचे आजोबा सगळ्यात आधी इथे येऊन स्थायिक झाले.. आता कुटुंब वाढल्याने ८/९ घरे झाल्येत. 
   आम्ही रामदासच्या भावाच्या घरी उतरलो. सारवलेले, स्वच्छ आंगण.. आंगणात चिंचेच्या झाडाखाली एक लाकडी पलंग ठेवला होता... विटांच्या भिंती असलेले कौलारू घरही छान शेणामातीने सारवलेले होते. आम्ही बाहेरच आंगणात गप्पा मारत बसलो. गावात वीज नाहीये. बाजूच्या घराच्या कौलांवर सोलार पॅनेल लावलाय. त्या विजेवर २/३ बल्ब लागतात तेवढेच. बाकी घरात वगैरे वीज नाहीच. एक टाटा इंडिकॉमचा फोन त्या आंगणात होता. दादा म्हणाला, हा इथला कॉमन फोन आहे. फोन वाजला की जवळपासच कोणीही उचलत... मला गंमत वाटली. :) 
   गावात एकही दवाखाना नाही. त्यामुळे आजारी माणसाला झोळीतून दरड चढून एकतर कोगद्याला किंवा दुसर्‍या बाजूने आहिरे गावात ( सुमारे ३.५ किमी ) न्यावे लागते. प्रत्येक बाईला किमान ३/४ मुले आहेत... पाड्यात दवाखानाच नसल्याने बाळंतपण घरातच होत असणार... गावातली मुले बाजूच्या गेटपाड्यातल्या ( सुमारे १.५ किमी ) प्राथमिक शाळेत जातात. त्यापुढे शिकायचे झाल्यास अजुन पुढे २ किमी वरच्या आहिरे गावात जायला लागते. गावातले लोक मजुरीच्या कामावर जातात आणि हंगामात शेती करतात. भात, उडीद, नाचणी अशी पिके होतात. घरात शेळ्या, कोंबड्या, गाय-बैल असे पाळीव प्राणी आहेत. भात, नाचणीची भाकरी, भाजी आणि काही खास प्रसंगी कोंबडी/ शेळीचे मटण असा लोकांचा आहार आहे.
   आम्ही गेलो तेव्हा गावातल्या बर्‍याच लोकांनी मजुरीसाठी स्थलांतर केले होते. घरात वृद्ध माणसं आणि लहान मुलं तेवढी होती. आमच्या अवतीभोवती पाड्यातली १५/१६ लहान मुले जमली होती... कुतुहलाने आमच्याकडे पाहात होती... दबक्या आवाजात एकमेकांशी बोलत होती... आमच्याशी गप्पा मारायला मात्र लाजत होती.. :) जमलेल्या आदीवासींशी दादा रोजगार हमी योजानेबद्दल, मोबदला वेळेवर मिळाला नाही तर करायच्या तक्रार अर्जाविषयी वगैरे चर्चा करत होता. लोकं शांतपणे ऐकत होती. ८.३० च्या सुमारास आम्ही सुट्टी केली (मीटिंग संपवली). पोटात कावळ्यांनी केव्हाच काव काव सुरू केले होते... जेवणाचा निरोप घेऊन रामदास आला तेव्हा हायसे वाटले! :) 
   रामदासनी एक पातेल हात धुण्यासाठी पुढे केलं... आधी अशा रॉयल ट्रीटमेंट साठी आम्हाला संकोच वाटला.. मात्र ते पाणी रियूज केले जाते असे कळ्ल्यावर आम्ही निमूट त्यात हात धुतले. ताट भरून भात, पात्तळ आमटी, फ्लॉवर बटाटा भाजी आणि कांदा असा फक्कड बेत होता. जेवण झाल्यावर पुन्हा आंगणात गप्पा रंगल्या... आकाशात तारे, नक्षत्रे आपापले अस्तित्व दाखवत मस्त लूकलुकत होती.. १०.३० वाजता ओसरीवर पथारी टाकून निजलो. निरव शांतता... आंगणातल्या दिव्या व्यतिरिक्त कुठलाच प्रकाश नाही. एक वेगळेच शांत वातावरण खूप दिवासांनी अनुभवायला मिळत होते.
   सकाळी तोंड वगैरे धुवून ताईंशी रामदासाच्या वहिनीशी स्वयंपाकघरात गप्पा मारत बसलो. शेणानी छान सारवलेले स्वयंपाकघर चुलितल्या जळणामुळे मस्त उबदार झाले होते...घरातल्या मांजरीची पिल्ले उबेसाठी कोपर्‍यात पहुडली होती. ताईंनी चुलीवर एका बाजूला चहा ठेवला होता आणि एकीकडे भाक-यांचा तवा टाकला होता. गावची आरोग्यसेवीका म्हणून ताईंनी काम केले होते. वर जव्हारला जाऊन औषधे, लसी घेऊन यायच्या, गावातल्या लहान मुलांना पोलिओ डोस द्यायचे असे कामाचे स्वरुप होते. "इतक्या दुर्गम भागात नर्स यायला तयार होत नाहीत त्यामुळे निरक्षर असूनही माझ्यावर काम सोपवले गेले".... "लहानपणी गुर चारायला जावे लागे त्यामुळे शाळेत जाऊ शकले नाही"..... ताई सांगत होत्या.... ताईंनी कौतुकानी आम्हाला चहाबरोबर त्यांच्या लहानशा दुकानातले टोस्ट खाऊ घातले. जाताना नागलीच्या भाकरीची चव चाखुन ताईंचा आणि खैरमाळचा निरोप घेऊन बाहेर पडलो...
 ०  सकाळी ५/६ महिने गर्भवती असलेल्या महीलेला देखील पाण्यासाठी टेकडी उतरताना पाहीले होते.. मनात आले आपल्याकडे अशा भावी मातांची आपण किती काळजी घेतो नाहीतर इथे... पण इथे गावात कुठेच विहीर नाही.. (विहिरीला पाणी लागत नाही) त्यामुळे पाण्यासाठी टेकडीची चढउतार अपरिहार्य आहे.
०  खैरमाळ सारख्या ५०/६० लोकवस्तीच्या जंगल पाड्यात दवाखाना कुठून असणार? पण काहीतरी मार्ग काढून गावात आरोग्य सेवा पोहोचायला हवी... ही सगळी आपल्यासारखीच २१ व्या शतकातली माणसे आहेत आणि आज जरी कमी असली तरी काही वर्षानी इथली लोकसंख्या वाढणारच आहे. मुंबईतल्या अनाधिकृत झोपड्या दर १०/१५ वर्षानी अधिकृत होतात. त्या लोकांना वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य अशा सर्व सोयी उपलब्ध होतात. शासानाबरोबरच कित्येक स्वयंसेवी संस्था अशा झोपडपट्टीत आरोग्य, शिक्षण देण्यासाठी झटत असतात. मग खैरमाळ सारख्या पाड्यातले लोक तर वर्षानुवर्षे दशकानूदशके तिथे वास्तव्य करून आहेत. तरीही दुर्गम भौगोलीक परिस्थिती आणि छोटा समुह यामुळे शासनदरबारी यांना स्थान नाही. 
   आपल्याला शहरात मूलभूत सोयींबरोबरच विवीध मनोरंजनाची साधने, उच्च शिक्षणाच्या अनेक सोयी, बाजारपेठा, रोजगाराचे असंख्य पर्याय उपलब्ध असतात. पण इतके सगळे असूनही आपण आतून कुठेतरी अस्वस्थ असतो. नाखूश असतो आपल्या जगण्यावर. आपल्याला सतत काहीतरी नवीन करायचे असते, शिकायचे असते, अपग्रेड व्हायचे असते. नवीन जागा, घर, नोकरी, लोनचे इएमआइ, मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक गैजेट अशी टार्गेट्स डोळ्यासमोर ठेऊन जगत असतो. आयुष्याकडून आपल्या प्रचंड अपेक्षा असतात. त्या पूर्ण करायच्या नादात, सततच्या स्पर्धेच्या वतावरणात लहान सहान गोष्टीतला आनंद घ्यायलाच आपण विसरतो. जास्त पैसे खर्च करून सुख विकत घेता येते असा काहीसा आपण स्वता:चा समज करून घेतो. आपल्या वैयक्तिक आयुष्यातील प्रगतीपुढे सामाजीक आयुष्यातील प्रश्नांकडे, इतर समाजघटकांच्या सुख दु:खाकडे लक्ष्य द्यायला आपल्याला फुरसतच नसते. स्वता:च्या आयुष्याभोवतीच आपण पिंगा घालत असतो!
   खैरमाळला आल्यावर जाणवले, आपल्याला शहरात उपलब्ध असणार्‍या असंख्य सोयी इथे नाहीत. पण तरीही इथल्या जगण्यात एकप्रकारचे समाधान आहे, सुकून आहे. लोकांच्या गरजाच मुळात मर्यादित आहेत त्यामुळे त्या पूर्ण करताना त्यांची दमछाक होत नाही. मुलांकडे एकत्र जमून खेळायला भरपूर मोकळी जागा आहे.. खायला रानमेवा आहे... मुले मोठ्यांना पाणी भरण्याच्या आणि शेतीच्या कामात मदत करतात त्यामुळे आपल्याकडे क्वचित दिसणारे संपूर्ण घरातले Bonding  इथे आहे. इथले लोक निसर्गाच्या सोबतीने त्याच्या शीतल छत्राखाली जगतात त्यामुळेच कदाचित इथल्या कष्टकरी लोकांच्या सावळ्या चेह-यावर समाधानाचे तेज दिसते. पाणी, आरोग्य, वीज यांसारख्या मुलभूत सोयी आणि पशुपालन, शेतीतले तंत्रज्ञान, उपयुक्त वनस्पती लागवडीचे आणि बाजारपेठेचे ज्ञान यासारखे व्यावहारीक शिक्षण इथे पोहोचले तर तारप्याच्या तालावर थिरकणारे इथले साधे जीवन अधिक सुकर आणि समृद्ध होईल यात शंका नाही.

- रसिका जोशी