Friday, February 7, 2014

''शेंगदाणेवाला''.....





    
 
अलीकडे जुहूच्या समुद्रावरच्या या शेंगदाणेवाल्याकडे पाहून आठवलेली एक गंमत... 'फेरीवाले' आणि त्यांची वस्तू विकायची स्टाइल नेहमीच माझा आवडीचा आणि कुतुहलाचा विषय असतो...''शेंगदाणेवाला'' हा असाच माझा एक आवडीचा मनुष्य!
  लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत खडखडत्या एस टी उर्फ लाल डब्यात बसून गावाला जातानाच्या माझया काही खास आठवणी आहेत... उकाडा.. तापलेली एस टी.. घामाच्या धारा.. कोकणातल्या वेड्या वाकड्या वाटा.. त्यात भारी कंडीशन ( !! ) असलेली, धुराचे लोट सोडणारी एस टी.... रिज़र्वेशन न करता पोरा बाळांसकट प्रवास करणारे प्रवासी... मग अशीच कोणीतरी बाई आपल्या मुलाला मांडीवर घेऊन आमच्या सीट वर गर्दी करून बसल्ये.... त्यात पुढच्या मागच्या किंवा बाजूच्या कोणातरी पोराला उलटी होत्ये.... मग वार्‍याबरोबर सुटलेला तो वास.... मग त्या वासामुळे आपल्याला पण आता उलटी होत्ये की काय अशी वाटणारी भीती!!! मग आईला ''आई अजुन किती लांब आहे!!!'' असं माझ आणि बहिणीच विचारण..... या सगळ्या भयंssकर प्रकारात काही दिलासा देणार्‍या गोष्टी होत्या.... त्या म्हणजे पेण स्थानकात मिळणारा बटाटा वडा आणि प्रत्येक मुख्य स्थानकात मिळणारे चणे - शेंगदाणे... वेफर्स !! पेण, वडखळ, इंदापूरच्या एस टी डेपोतला शेंगदाणेवाल्यांचा कलकलाट आणि एस टी थांबली रे थांबली की खिडकीजवळ येऊन पुड्या विकायची त्यांची लगबग मला अजून आठवत्ये!! कुणी ''सेंगआलेयsss.....'' असा ओरडायचा तर कुणी ''बोला सेंग ???.'' असा प्रश्नार्थक सूर लावायचा... पण मला सगळ्यात भारी वाटलेला एक प्रकार म्हणजे, त्यांच ''बोला खारे खारे दाणेsss बोला खारे सेंगादाणेsss बोला एक एक रुपया दाणेsss" हे गाणं!!!
   आता एका रुपयात शेंगदाणे मिळत नाहीत आणि या स्टाइलनी शेंगदाणे विकणारा माणूसही हल्ली दिसत नाही... पण तरी अजूनही इंदापूर, पेण स्टॅंड वर शेंगदाणेवाले दिसले की लहानपणीचे दिवस आठवतात...

- रसिका

No comments:

Post a Comment