Friday, June 27, 2014

ब्युटी स्पॉट!

   ल्ली सगळ्या गोष्टींवर आपण सतत उतारे किंवा ठोस उपाय शोधत असतो... म्हणजे अगदी साध्या सर्दी खोकल्यापासून ते मानसिक दुखण्यांपर्यंत ( इथे मानसिक विकार अभिप्रेत नाहीत! ) ......... कोणाचीतरी प्रचंड आठवण येऊन अस्वस्थ वाटतं किंवा कुठलातरी अपेक्षाभंग मनाला खूप त्रास देत असतो... खुपत असतो... कधीतरी वाटतं अशा दु:खांवर मात करण्याऐवजी असु द्यावीत ती मनाच्या एका कोपर्‍यात. ती वेदना जिवंत ठेवावी. खरतर ती मुळापासून उखडून टाकणं कोणालाच शक्य नसतं... म्हणूनच ती नाहीच अस म्हणून तिचं अस्तित्व तरी नाकारू नये! या जखमा मनाला जागृत ठेवतात. अधिक संवेदनशील बनवतात... आणि पुढच्या वेळेस ठेच लागण्या आधीच सावधही करतात! त्यावर योग्य फुंकर घालणारी व्यक्ती जेव्हा मिळेल तेव्हा त्या वाहू द्याव्यातच पण एरवी देखील एकांतात त्यांना आपल्यावर सत्ता गाजवू द्यावी. म्हणजे त्या दु:खाला दडपून टाकण्यात आपली शक्ती व्यर्थ जात नाही.. ते दु:ख अनुभवून त्याचा निचरा झाल्यावर मनाला थोपटत म्हणावे ''आल इज वेल!!''
   येत असेल कोणाची आठवण तर ती येऊ द्यावी... विराहामुळे नात्यांची खोली आणि गोडी दोन्ही वाढते!! नात्यांना तपासून पाहता येते... त्याचा आकार आणि व्याप्ती कळते.
   शेवटी काय, दु:खाची, काळजीची काजळी असणारच आहे... फक्त तिला आपले आयुष्य व्यापू द्यावे की ब्युटी स्पॉट प्रमाणे तिचे अस्तित्व मान्य करत बाळगावे ही निवड आपलीच असणार आहे!

- रसिका

2 comments:

  1. जगण्यातली अशाश्वतता, क्षणभंगूरताच आपल्या जोखीम घ्यायला उकसवते. आहे आणि नाहीच्या मधली ती अंधारी पोकळी आपल्याला कुतूहलाने आत डोकावायला भाग पाडते. तीच नसेल तर जगण्यातलं कुतूहल संपेल आणि मग अंतराळात सोडलेल्या यानासारखंच आपण अंधातरी, विरोधविरहीत पुढे पुढे जात राहू. मला तरी असं सदासुखी निरर्थक आयुष्य जगायला नाही आवडणार. तुला आवडेल?

    ReplyDelete
    Replies
    1. मलाही नाही आवडणार... नाही आवडत... :)
      आलेल अपयश, पचवलेलं दु:ख सकारात्मक दृष्टीनी स्विकारलं तर तेही सुंदर भासतं... कारण अपयश का असेना तो अनुभव / काळ / प्रसंग आपण भरभरून जगलेलो असतो! त्या त्या वेळी आपण केलेली ती निवड असते..

      Delete