Tuesday, June 10, 2014


प्रत्येकाचे 'अभिमान' आणि प्रत्येकाची 'तत्व'!
प्रत्येकाच्या अपेक्षा अन् प्रत्येकाचे 'स्वातंत्र्य'!
आपापले स्वातंत्र्य जपायचा आज प्रत्येकाचा प्रयत्न,
मी म्हणेन तस समोरच्याने वागावे हा मात्र प्रत्येकाचाच आग्रह (बर्‍याचदा हट्ट!) !
मैत्री, प्रेम, जिव्हाळ्याच्या नात्यांना होतोय का या 'स्पेस' चा जाच?
की अजुन पुरेसे शिकायचोय आपण व्यक्तिस्वातंत्र्याचे प्रॅक्टिकल?
की हा आहे पिढ्यांमधल्या वैचारीक अंतराचा मुद्दा?
माझ्यावर फक्त माझाच हक्क, मी माझा स्वतंत्र...
पण मग प्रेमाच्या ओलाव्यासाठी का आतून तुटतो इथे प्रत्येकजण?
अपेक्षाभंग इथे रोजचाच आणि प्रेमळ रुसव्या
फुगव्यांची जागा केव्हाच घेतल्ये धुसफूस आणि चिडचिडीनं.......
मनामनातल्या या शीतयुद्धाला आस आहे सामंजस्याची...
धुमसणार्‍या मनांना ओढ आहे शीतल, आश्वासक उबा-याची.....

- रसिका

Wednesday, March 12, 2014


आम्ही करतोय इथे मजा मस्तीचे सोहळे
माझा शेतकरी सखा झेली गारपिटीची वादळे....
आमचे जगणेच कोरडे, माती-पावसाशी आम्हा काय देणे घेणे ?
ज्यानी राखले मातीशीच इमानं; त्याला मात्र प्रकोपाचा मान !
घर्म बिंदूंनी मांडली ज्याने मातीची पूजा
आणि कष्टाने ज्याने फुलवला आपला मळा,
त्याच्याच माथी हाणी तो वरचा बाबा गारपिटीची काठी...
आम्ही कोरडे ते कोरडेच.. नामनिराळे, करू मस्तीचे सोहळे ........

- रसिका

Monday, March 3, 2014

वेड!!!


कधीतरी वाटत मला अशी फरफरा चित्र काढावीत लहान मुलांसारखी.... किंवा पळत सुटाव वार्‍यासारख...
किंवा रानोमाळ भटकावं अगदी स्वछंदी!! पिंजून काढावा देश गावोवाव भट्काव... कुपोषण म्हणजे नेमक काय.. अर्धापोटी जगणारी माणस पाहावीत जरा आपला कंफर्ट झोन सोडून... पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून (शब्दष:!) काम करणारी मी, घ्यावी जरा समजून तळागाळातल्या स्त्रीची व्यथा!!  कोण जाणे हे सगळं करता येईल की नाही... पण यातल्या काही गोष्टी तरी करता याव्यात आयुष्यात... तेवढे बळ एकवटूदेत!!

Friday, February 14, 2014

ना बनाओ अपने दिल को शीशेसा नाज़ुक यारों....
पाओगे उसे टूटा हूआ गम की एकही लकीर से.......

नाहीं बनाओ उसे पत्थर जैसा सख़्त,
जिसतक जसबाद पोहोच ही ना सके...

बनाओ उसे शंख जैसा ज़िंदादील और गेहेरा,
अगर कोई साद दे तो प्रतिसाद दे सके;
और कोई ध्यान से सुननेवाला मिलें, तो अपने गेहेरे राज़ खोल सके....

- रसिका

Sunday, February 9, 2014

मन १: ( स्वत:ला ) व्यक्त हो व्यक्त!!
मन २: कशाला? का तुला सतत व्यक्त व्हायचा सोस? अव्यक्त होऊनही; मौनातूनही भावना व्यक्त करता येतात की!
मन १: अरे पण त्याने गैरसमज होतात... आपण बोलल्याशिवाय कळत नाही समोरच्याला...
मन २: अरे पण काही गोष्टी अव्यक्त.. अपूर्ण ठेवण्यातच मज्जा असते... आणि व्यक्त न झाल्यामुळे संबंधही  बिघडत नाहीत!
मन १: ह्मम्म.. पण माझा स्वभावच नाही रे तो! व्यक्त झालं; बोलून टाकलं की कस हलक वाटत...कधी चुकून तुझ्यासारखा वागायला गेलो की घुसमटायला होत!!
मन २: ह्मम्म!! आणि मग लागतो निकाल सगळ्याचा! लोक काय समजायच ते समजतात!!
मन १: लोक नेहमीच त्यांना हव तेच समजतात! म्हणूनच तुझ्यासारख मनात एक, ओठात एक नाही जमणार   मला!! बिघडले संबंध तर बिघडूदेत! मला ज्यांच्याबद्दल प्रचंड प्रेम वाटताय, ज्यांच्याबद्दल आदर, माया वाटत्ये त्यांना मी थेट सांगणार ! जिथे नाही पटणार तिथे स्पष्ट नापसंती दर्शवणार! उगाच गुडी गुडी, तुझ्यासारख पॉलीटीकल वागायला नाही जमणार मला!
मन २: म्हणूनच लोक तुला फटकळ म्हणतात!
मन १: अरे फटकळपणा, भांडण करण हा काही माझा स्वभाव नाही! माझा स्वभाव जे आहे ते मॅनीप्युलेट (manipulate) न करता व्यक्त करण! स्पष्ट! स्वच्छ!
मन २: ह्मम्म... तू असा आहेस म्हणूनच तुला मित्र कमी आहेत!
मन १: असेनातका! जे आहेत ते नक्की माझे आहेत! कुठल्याही वेष्ट्नाशीवाय... मला 'रॉ' स्वीकारणारे!

- रसिका

Friday, February 7, 2014

''शेंगदाणेवाला''.....





    
 
अलीकडे जुहूच्या समुद्रावरच्या या शेंगदाणेवाल्याकडे पाहून आठवलेली एक गंमत... 'फेरीवाले' आणि त्यांची वस्तू विकायची स्टाइल नेहमीच माझा आवडीचा आणि कुतुहलाचा विषय असतो...''शेंगदाणेवाला'' हा असाच माझा एक आवडीचा मनुष्य!
  लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत खडखडत्या एस टी उर्फ लाल डब्यात बसून गावाला जातानाच्या माझया काही खास आठवणी आहेत... उकाडा.. तापलेली एस टी.. घामाच्या धारा.. कोकणातल्या वेड्या वाकड्या वाटा.. त्यात भारी कंडीशन ( !! ) असलेली, धुराचे लोट सोडणारी एस टी.... रिज़र्वेशन न करता पोरा बाळांसकट प्रवास करणारे प्रवासी... मग अशीच कोणीतरी बाई आपल्या मुलाला मांडीवर घेऊन आमच्या सीट वर गर्दी करून बसल्ये.... त्यात पुढच्या मागच्या किंवा बाजूच्या कोणातरी पोराला उलटी होत्ये.... मग वार्‍याबरोबर सुटलेला तो वास.... मग त्या वासामुळे आपल्याला पण आता उलटी होत्ये की काय अशी वाटणारी भीती!!! मग आईला ''आई अजुन किती लांब आहे!!!'' असं माझ आणि बहिणीच विचारण..... या सगळ्या भयंssकर प्रकारात काही दिलासा देणार्‍या गोष्टी होत्या.... त्या म्हणजे पेण स्थानकात मिळणारा बटाटा वडा आणि प्रत्येक मुख्य स्थानकात मिळणारे चणे - शेंगदाणे... वेफर्स !! पेण, वडखळ, इंदापूरच्या एस टी डेपोतला शेंगदाणेवाल्यांचा कलकलाट आणि एस टी थांबली रे थांबली की खिडकीजवळ येऊन पुड्या विकायची त्यांची लगबग मला अजून आठवत्ये!! कुणी ''सेंगआलेयsss.....'' असा ओरडायचा तर कुणी ''बोला सेंग ???.'' असा प्रश्नार्थक सूर लावायचा... पण मला सगळ्यात भारी वाटलेला एक प्रकार म्हणजे, त्यांच ''बोला खारे खारे दाणेsss बोला खारे सेंगादाणेsss बोला एक एक रुपया दाणेsss" हे गाणं!!!
   आता एका रुपयात शेंगदाणे मिळत नाहीत आणि या स्टाइलनी शेंगदाणे विकणारा माणूसही हल्ली दिसत नाही... पण तरी अजूनही इंदापूर, पेण स्टॅंड वर शेंगदाणेवाले दिसले की लहानपणीचे दिवस आठवतात...

- रसिका

. . -// .. .. ..//-.... .... a b u s e d . . . . . .. ..//--..---///